मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १३३ वर पोहोचली. इस्लामिक स्टेट ग्रुपने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याप्रकरणी ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
पुतिन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर काही दिवसांतच हा हल्ला झाला. इसिसच्या अफगाणिस्तानमधील शाखेने रशियात हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती आम्ही रशियाला दिली होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. रशियन रॉक बँडचा कार्यक्रम ऐकण्यासाठी क्रॉकस सिटी हॉलमध्ये शेकडो प्रेक्षक उपस्थित होते. सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करताच प्रेक्षक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हल्लेखोरांनी प्रेक्षकांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर लागलेल्या आगीत हॉलची बाल्कनीही कोसळली.
रशियात झालेले दहशतवादी हल्ले२००२ : मॉस्कोच्या दुब्रोवका थिएटरमध्ये ४० ते ५० सशस्त्र चेचेन्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात १७० जण ठार झाले होते.२००६ : बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू.मार्च २०१० : माॅस्कोच्या मेट्रो स्थानकांत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ३८ जण ठार झाले होते.ऑक्टोबर २०१५ : रशियन विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात २२४ जणांचा मृत्यू झाला होता.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला निषेधया हल्ल्याचा तीव्र निषेध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की, या हल्ल्यामुळे रशियातील नागरिकांची मोठी हानी झाली असून, आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही रशियातील हल्ल्याचा निषेध केला.