आफ्रिकन देश कांगोमध्ये भयानक घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांविरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर बेछुट गोळीबार करण्यात आला आहे. तसेच अनेकांना चाकूने भोसकण्यात देखील आले आहे. यामध्ये ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कांगोच्या सैन्याने ही कारवाई केली आहे. सुरुवातीला सैन्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.
बुधवारी पूर्वेकडील कांगोतील शहर गोमा येथे हिंसक निदर्शने झाली, त्यात 56 लोक जखमी झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कांगोच्या सैन्याने ही कारवाई केली आहे. गोमा शहरात यूएन शांती मिशन आणि इतर परदेशी संस्थांविरुद्ध होत असलेली निदर्शने सैन्याने कारवाईत चिरडून टाकली आहेत.
पोलिस कर्मचाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे कॉंगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यातील मृतांची संख्या 40 पेक्षा जास्त आहे, असे दोन लष्करी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले आहे. आंदोलकांच्या मृत्यूची चौकशी करत आहोत असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. कांगोच्या लष्करी अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लष्कर डझनभर मृतदेह एका ट्रॉलीमध्ये ओढत असल्याचे दिसत आहे.
इंटरनॅशनल रेड क्रॉसच्या स्थानिक शाखेच्या प्रमुख अॅन सिल्वी लिंडर यांच्यानुसार अनेक जखमी रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले होते, त्यांना चाकू आणि बंदुकीच्या गोळ्यांचे घाव होते. यापैकी काही जखमी मृतावस्थेत होते.