ऑनलाइन लोकमत -
बीजिंग, दि. १४ - आयुष्यभर आणि मृ्त्यूनंतरही एकत्र राहण्याच्या शपथा अनेकजण घेतात. मात्र म्हणून मृ्त्यूनंतरही आपण किंवा आपले मृतदेह एकत्र राहावेत अशी इच्छा कुणाची असेल का ? याच उत्तर अनेकजण नाहीच म्हणून देतील. मात्र ग्रामीण चीनमध्ये मृ्त्यूनंतरही प्रेम ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळेच येथे मृतदेहांचे विवाह लावले जात असल्याची भयानक प्रथा समोर आली आहे.
मिस्टीरिअस युनिव्हर्सने दिलेल्या वृत्तानुसार डोंगबाओ गावात मृतदेहांचं लग्न लावण्यासाठी 36 मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रथेप्रमाणे अविवाहित तरुणाच्या मृतदेहाचं लग्न एका विवाहित महिलेच्या मृतदेहाशी लावलं जातं. 1949 पर्यंत चीनमध्ये ही प्रथा रुढ होती. या प्रथेप्रमाणे जर एखाद्या पुरुषाचा अविवाहित असतानाच मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला शाप लागतो. हा शाप आपल्या कुटुंबाला लागू नये म्हणून त्या मृतदेहाचा विवाह एका दुस-या मृतदेहाशी लावला जातो आणि महत्वाचं म्हणजे ज्या मृतदेहाशी लग्न लावलं जाव ती महिला विवाहित असणं गरजेचे आहे. पीपल्स रिपब्लिकने यावर बंदी आणली होती. मात्र डोंगबाओ गावातील घटनांमुळे ही प्रथा पुन्हा एकदा सुरु झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
स्मशानभुमीतून विवाहित महिलांचे मृतदेह खोदून बाहेर काढण्यासाठी लोक मोठी रक्कम देत आहेत. खोदकाम करणारे चोरदेखील आपल्यासोबत जाताना पेन नेत आहेत आणि त्या मृतदेहाचं माप घेत आहेत. जेणेकरुन त्या मृतदेहाला लग्नाचे कपडे व्यवस्थित बसावेत. ही प्रथा बेकायदेशीर असल्याने या घटनेचे कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत मात्र अनेक ठिकाणी खड्डे खोदून मृतदेह बाहेर काढून नेल्याचं मात्र दिसत आहे.