नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला असून जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाने अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत अद्यापही लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा मोठा परिणाम देशांच्या आर्थिक स्थितीवर आणि रोजगारावर झाला आहे. आता, जागतिक कामगार संघटनेकडून बेरोजगारीसंदर्भात भाकित करण्यात आले आहे. कोरोनाचा कहर असाच राहिल्यास मोठ्या बेरोजगारीचा सामना करावा लागेल, असा इशाराच आयएलओने दिला आहे.
कोरोनाने अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊनमुळे बेरोजगारीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे, 2020 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलै ते डिसेंबरदरम्यान कोरोना व्हायरसचा आणखी प्रादुर्भाव दिसून आला किंवा वाढला तर कामगारांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यास जगभरातील कामाच्या तासांमध्ये 11.9 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. तर, तब्बल 3 कोटी 40 लाख पूर्णवेळ कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, असे भाकितच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सर्वेक्षणाच्या 5 व्या आवृत्तीनुसार, कोरोनामुळे जगभरातील कामाचं झालेलं नुकसान, कामगारांच्या गेलेल्या नोकऱ्यांमुळे पुढील काळातही अनिश्चितता आणि परिपूर्ण असं काम होणार नसल्याचे दिसून येत आहे. सन 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत कामाच्या तासांमध्ये 14 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, साधारण 4 कोटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे संचालक जनरल गे रिडर यांनी चालू वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यातील धोक्याबाबत भाकित केले आहे. गेल्या 2 तिमाहीत झालेलं नुकसान भरुन येणे सहजासहजी शक्य नसून कोरोनाची आणखी लाट आल्यास मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, असे रिडर यांनी म्हटलंय.