कोलंबो - श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटातून जात आहे. देशात आणीबाणी लागू आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. त्रिंकोमाली नौदल तळासमोरही आज निदर्शने सुरू झाली. या निदर्शनावेळी जमाव आक्रमक होत असून सरकारी संपत्तीचे नुकसान करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता श्रीलंकेतील सैन्य दलाला महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीलंकेतील संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे.
संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलास शूट एट साईट म्हणजेच हिंसा करणाऱ्यांना जागीच गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. देशातील अनेक भागात हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कोलंबोमधील 'टेम्पल ट्रीज' हे अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर त्रिंकोमाली नौदलच्या तळावर आश्रय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येथील लोकांनी निदर्शने सुरू केली आहेत. या निदर्शनात आत्तापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला असून 150 जणांपेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत.
आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेत आता लोकांचा संताप अनावर होत चालला आहे. या संकटात सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला जीव गमवावा लागला आहे. तर महिंदा राजपक्षे यांचं घरही लोकांनी जाळून टाकलं आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात रक्तपात होत असून आर्थिक मंदीच्या संघर्षात खासदारांसह अनेकांचे जीव गेले आहेत. आतापर्यंत १५० जण जखमी झाले आहेत. राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
लोकांना शांतता राखण्याचे आवाहन
निदर्शनांदरम्यान महिंदा राजपक्षे यांचे भाऊ राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, "मी लोकांना आवाहन करतो की, शांत राहा आणि हिंसाचार थांबवा, नागरिकांविरोधात बदलाची कारवाई करू नये, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत. राजकीय स्थिरता बहाल करण्यासाठी आणि सहमतीने आर्थिक संकट सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत."