गाजियांटेप : अणुबॉम्ब कोसळावा आणि होत्याचे नव्हते व्हावे, अशी स्थिती आमची झाली होती... भूकंप महाभयंकर होता.. ढिगाऱ्याखालून निघालेल्यांपैकी काही जण थरथरत आपला अनुभव कथन करत होता. तुर्कस्तान व सीरियातीलभूकंप बळींची संख्या १९ हजारांहून अधिक झाल्याची माहिती तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने गुरुवारी दिली.
ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह आढळून आल्यामुळे मृतांचा आकडा वाढला. दरम्यान, बचाव व मदत पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असून, आज आणखी काही जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले. तथापि, जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतशी जिवंत लोक सापडण्याची आशा धूसर होत चालली आहे.
एवढ्या इमारती का कोसळल्या? - इस्तांबून टेक्निकल युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर ओकान तुयसुझ यांच्या मते, सोमवारचा प्रसंग महाभयंकर होता. पहिला भूकंपाची तीव्रता तर ५० लाख टन टीएनटी स्फोटकांच्या हादऱ्यापेक्षा मोठा होता. दुसरा ३५ लाख टन टीएनटीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेएवढा होता. अशा भीषण हादऱ्यांमध्ये इमारती टीकाव धरणे शक्यच नव्हते.
- तुर्कीतील सिव्हिल इंजिनिअर सिनान तुरक्कन यांच्या मते, भूकंपाचा हादरा भयंकर तर होताच, शिवाय तो पाठोपाठ होता. त्यामुळे पहिल्या हादऱ्यात जास्त इमारती कोसळल्या नाहीत; पण लगेच दुसरा हादरा बसल्याने इमारती कोलमडून जमीनदोस्त झाल्या.
जिवंत राहण्याची शक्यता किती?बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक वाचण्याच्या दृष्टीने भूकंपानंतरचे पहिले ७२ तास महत्त्वपूर्ण असतात, असे इंग्लंडमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाचे नैसर्गिक धोके तज्ज्ञ स्टीव्हन गोडबाय यांनी सांगितले. पहिल्या २४ तासांत जिवंत राहण्याचे सरासरी प्रमाण ७४ टक्के, ७२ तासांनंतर २२ टक्के आणि पाचव्या दिवशी सहा टक्के एवढे असते, असे ते म्हणाले. कोणत्या देशात किती बळी?- तुर्कस्तानच्या भूकंप व भूकंपोत्तर धक्क्यांमुळे सोमवारी पहाटे १६,१७० लोकांचा मृत्यू झाला तर ६० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.- दुसरीकडे, सीरियाचही ३,१६२ लोक मृत्युमुखी पडले असून, पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे जीवितहानीसह मालमत्तेची मोठी हानी झाल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत.
- ७००० इमारती एकट्या तुर्कीमध्ये काेसळल्या - २,००,००,००० इमारती तुर्कीमध्ये असून, भूकंपाची सातत्याने भीती असणाऱ्या क्षेत्रात १२ लाख इमारती भूकंपात कोसळू शकतात, अशा स्थितीत आहेत.