रशियाची राजधारी मॉस्कोमध्ये शुक्रवारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे १५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यातील जखमींची संख्या १२० पर्यंत पोहोचली आहे. रशियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार जण थेटपणे हल्ल्यात सहभागी होते, अशी माहिती तपास समितीने दिली आहे.
दरम्यान, रशियामधील अनेक तपास संस्था आणि काही नेत्यांनी या हल्ल्याचा संबंध युक्रेनशी असल्याचा आरोप केला आहे. मात्र आयएसआयएसने या हल्ल्याती जबाबदारी स्वीकारली होती. तर अमेरिकन तपास यंत्रणांनीही या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पश्चिम रशियामधील ब्रांस्क भागातून चार संशयितांनी अटक करण्यात आली असल्याचे रशियातील तपास यंत्रणांनी सांगितले आहे. हा भाग युक्रेनच्या सीमेपासून खूप जवळ आहे. हल्लेखोर सीमा पार करून युक्रेनमध्ये जाण्याच्या तयारीत होते, असा दावा काही प्रसारमाध्यमांनी एफएसबीच्या हवाल्याने केला आहे.
दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्यामध्ये घटनास्थळावर उपस्थित असलेल्या व्यक्तींना हल्लेखोर वेचून वेचून ठार मारत असल्याचे दिसून आले होते. तसेच हल्ल्यानंतर कॉन्सर्ट हॉलला भीषण आग लागली होती. मागच्या काही वर्षांत रशियामध्ये झालेला हा सर्वात भीषण हल्ला होता. रशियामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या असून, त्यात व्लादिमीर पुतीन हे राष्ट्रपती म्हणून मोठ्या बहुमतासह निवडून आले आहेत.