नवी दिल्ली /इस्लामाबाद : पाकिस्तान समोरा-समोर लढण्याची ताकद गमावून बसला आहे. म्हणूनच छुप्या दहशतवादाचा आधार घेत सीमेपलीकडून भ्याड हल्ले सुरू आहेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपावर पाकिस्तानने आज बुधवारी तीव्र आक्षेप नोंदवत, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले़ भारतानेही यावर तात्काळ प्रतिक्रिया देत, दहशतवाद हा भारत-पाक द्विपक्षीय संबंधातील सर्वाधिक चिंतेचा विषय असून केवळ पाकच्या नकारघंटेने ही चिंता मिटणारी नसल्याचे पाकिस्तानला खडसावून सांगितले़काल मंगळवारी मोदींनी पाकवर खरपूस टीका केली होती़ पाकिस्तानने आज ही टीका निराधार ठरवत, भारताच्या सर्वोच्च नेतृत्वाने अशी टीका करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले़ पाकविरुद्धचे छुप्या कारवायांचे सर्व आरोप निराधार आहेत़ यात कुठलेही तथ्य नाही़ असे आरोप करण्यापेक्षा उभय देशांनी चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे पाकच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तस्लीम असलम यांनी म्हटले़भारताने असलम यांच्या या प्रतिक्रियेला तात्काळ प्रत्त्युत्तर दिले. दहशतवाद हा आमच्यासाठी वर्तमानातील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे़ पंतप्रधान मोदी यांनी हीच चिंता व्यक्त केली़ दहशतवादाविरुद्ध पाकने केवळ ‘नकार’ दिल्याने आमची चिंता दूर होणार नाही, असे खडेबोल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले़ भारत दहशतवादासंदर्भातील आपल्या चिंतांवर आहे त्या सर्व पर्यायांद्वारे तोडगा शोधेल़ आमच्या उपाययोजनांवर कुठलीही मर्यादा नाही, असेही ते म्हणाले़ (वृत्तसंस्था)
दहशतवाद हाच कळीचा मुद्दा
By admin | Published: August 14, 2014 1:56 AM