वियनतियाने (लाओस) : सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निर्धारपूर्वक मुकाबला करण्याचे आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारे व दहशतवादाला वित्तपुरवठा करणारे नेटवर्क नष्ट करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केले.
लाओसची राजधानी वियनतियाने येथे दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (आसियान) बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढा देण्यासाठी सज्ज राहा. दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानांच्या नेटवर्कला नष्ट करा. आर्थिक, राजकीय, तांत्रिक आणि संपर्काच्या माध्यमातून उपाय शोधले जाऊ शकतात.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि दक्षिण कोरिया, सिंगापूर, लाओस आणि इतर देशांच्या नेत्यांची भेट घेतली आणि शिक्षण, कृषी तंत्रज्ञानासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. जयशंकर यांनी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेतली आणि विशेष धोरणात्मक भागीदारीवर व्यापक चर्चा केली. त्यांनी युरोपीय आयोगाच्या उपाध्यक्षांशीही चर्चा केली.
काय म्हणाले एस. जयशंकर
जयशंकर यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बाला यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी इंडोनेशिया आणि मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केली. दरम्यान, न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांना भेटणे नेहमीच आनंददायी असते, असे त्यांनी म्हटले आहे.