पोप यांच्या विमानातून : जगात आज सर्वत्र दिसत असलेल्या हिंसाचाराचे व दहशतवादाचे मूळ कोणत्याही धर्मात नाही. माणसाऐवजी पैशाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणून ठेवल्याने निर्माण झालेल्या सामाजिक अन्यायामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असे मत रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले.पाच दिवसांच्या पोलंड दौऱ्यावरून रोमला परतत असताना पोप विमानात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिंसाचाराची ओळख म्हणून इस्लामकडे बोट दाखविणे योग्य नाही. इस्लाम हा हिंसाचाराचा पुरस्कार करणारा धर्म नाही.२६ जुलै रोजी पश्चिम फ्रान्समध्ये एका रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना काही सुरेधारी इसमांनी घुसून चर्चच्या ८५ वर्षांच्या फादरची गळा चिरून हत्या केली होती. नंतर ‘इस्लामिक स्टेट’ने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. याविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पोपनी उपर्युक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जवळजवळ प्रत्येत धर्मात एक लहान मूलतत्ववादी गट असतोच. तसा तो आमच्यातही (कॅथलिक ख्रिश्चन) आहे, असे मला वाटते.पोप फ्रान्सिस म्हणाले की, केवळ इस्लामी हिंसाचाराविषयी मला बोलायचे नाही. इथे इटलीतही मी दररोज वर्तमानपत्रे पाहतो तेव्हा कोणी मैत्रिणीला तर कोणी सासूला ठार मारल्याच्या बातम्या दिसतात. हा हिंसाचार करणारे सर्वजण बाप्तिस्ता झालेले ख्रिश्चन आहेत. त्यामुळे इस्लामी हिंसाचाराविषयी बोललो तर मला कॅथलिक हिंसाचारावरही बोलावे लागेल. सर्वच मुस्लिम हिंसाचारी नसतात, एवढेच मला म्हणायचे आहे. इतर कोणत्याही धर्माच्या बाबतीतही हेच खरे आहे.जगात दहशतवाद बोकाळण्याची विविध कारणे विषय करताना पोप म्हणाले की, आता मी जे बोलणार आहे ते धोक्याचे आहे याची कल्पना असूनही मला असे म्हणायचे आहे की, जेव्हा अन्य काही पर्याय शिल्लक राहात नाही, जेव्हा पैशाला देव मानले जाते व माणसाऐवजी पैशाला केंद्रस्थानी ठेवून जागतिक अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला जातो तेव्हा दहशतवाद वाढीस लागतो.दहशतवादाचे हे प्राथमिक स्वरूप आहे. हा मानवतावादाविरुद्धचा दहशतवाद आहे. आपण (खरे तर) याची चर्चा करायला हवी, असेही पोप म्हणाले. फ्रान्समधील चर्चमध्ये झालेली फादरची हत्या हे जगात सुरु असलेल्या याच स्वरूपाच्या संघर्षाचे द्योतक आहे, पण याच्या मुळाशी कोणताही धर्म नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युरोपमधील अनेक तरुण ‘इसिस’च्या वाटेवर गेल्याचा संदर्भ देत पोप म्हणाले, मी स्वत:शीच विचार करतो की कोणताही आदर्श नसलेले, कोणताही कामधंदा नसलेले असे किती तरुण आपण युरोपमध्ये तयार केले आहेत? हेच युवक दारुच्या किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात किंवा ‘इसिस’मध्ये दाखल होतात. (वृत्तसंस्था)>जेव्हा अन्य काही पर्याय शिल्लक राहात नाही, जेव्हा पैशाला देव मानले जाते व माणसाऐवजी पैशाला केंद्रस्थानी ठेवून जागतिक अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला जातो, तेव्हा दहशतवाद वाढीस लागतो.-पोप फ्रान्सिस, रोमन कॅथलिक धर्मगुरू
माणसाऐवजी पैसा केंद्रस्थानी मानल्याने जगात दहशतवाद
By admin | Published: August 02, 2016 4:49 AM