इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामदरम्यानच जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजते. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी 7.40 वाजताच्या सुमारास झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पॅलेस्टिनी हल्लेखोर वेझमन रस्त्यावर वाहनातून उतरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. यांतील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन ऑफ ड्यूटी सैनिकांनी आणि एका शस्त्रधारी नागरिकाने या दोन्ही हल्लेखोरांवर प्रत्युत्तरात गोळीबार करून त्यांचा खात्मा केला.
या हल्ल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक बस स्टॉपवर उभे आहेत, याचवेळी अचानक दोन हल्लेखोर येतात आणि गोळीबार करण्यास सुरुवात करतात.
इस्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेटने दिलेल्या माहितीनुसार, मुराद नम्र (38) आणि इब्राहिम नम्र (30) अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. हे दोघेही हमासशी संबंधित असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याने यापूर्वी जेलमध्येही गेले होते. शिन बेटने दिलेल्या वृत्तानुसार, 2010 ते 2020 दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली मुराद अनेक वेळा कारागृहात गेला होता. तसेच, इब्राहिमही 2014 मध्ये कारागृहात गेलेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे M-16 अॅसॉल्ट रायफल आणि एक हँडगन होती. हल्लेखोरांच्या वाहनातूनही मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. पोलीस जवळपासच्या भागातही तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात एका 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका महिलेचा आणि एका पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, हा हल्ला ज्या स्टॉपवर झाला त्याच स्टॉपवर वर्षभरापूर्वीही दहशतवादी हल्ला झाला होता, असे बोलले जात आहे.