संसदेनजीकची घटना : मृतांत १७ विदेशी पर्यटकांचा समावेशट्युनिस : दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याने टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरले. येथील प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात १७ विदेशी पर्यकांसह २१ जण ठार झाले. संसदेनजीकच हे वस्तुसंग्रहालय आहे. हा हल्ला झाला तेव्हा संसदेत दहशतवादविरोधी विधेयकावर चर्चा चालू होती. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या टु्यनिशियातील हा अनेक वर्षांनंतरचा पहिला दहशतवादी हल्ला आहे. ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीबी इसीद यांनी सांगितले की, मृतांमध्ये पोलंड, इटली, जर्मनी आणि स्पेनच्या पर्यटकांचा समावेश आहे. सुरक्षा दलाने दोन हल्लेखोरांचा खात्मा केला असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. वस्तुंसग्रहालयावर हल्ला चढविला तेव्हा आतमध्ये जवळपास शंभर पर्यटक होते. हल्लेखोरांनी काही पर्यटकांना ओलिस ठेवल्याचे वृत्त आहे. तथापि, या वृत्ताला गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद अली अरौई यांनी दुजोरा दिला नाही. तथापि, आत पर्यटक असल्याचे त्यांनी सांगितले.बीबीसीच्या वृत्तानुसार ओलिस ठेवण्यात आलेल्यांत ब्रिटिश, इटली, फ्रेंच आणि स्पेनच्या नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्याची खबर थडकताच संसद भवन रिकामे करण्यात आले. दहशतवादविरोधी पथके संग्रहालयात दाखल झाली असून, संसद परिसरासह या सर्व भागांची नाकेबंदी करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद अली अरौई यांनी सांगितले.अत्यंत प्राचीन आणि दुर्मिळ अशा वस्तू या संग्रहालयात असल्याने जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने वस्तुसंग्रहलय पाहण्यासाठी ट्युनिसला भेट देत असतात. रॉयटर्सच्या मते, वस्तुसंग्रहालायात घुसलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने घेरले आहे. (वृत्तसंस्था)चौकट...उत्तर आफ्रिकेतील टु्यनिशियाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने बार्डो वस्तुसंग्रहालयावरील हा हल्ला म्हणजे टु्यनिशियाला बसलेला मोठा हादराच आहे. २०११ मध्ये झालेल्या उठावानंतर दहशतवादी हल्ला टाळण्यास टु्यनिशियाला यश आले होते. टु्यनिशियातील लोकक्रांतीचे (अरब स्प्रिंग) लोण शेजारच्या लिबिया, इजिप्त, सिरियात आणि येमेनमध्ये पोहोचले होते. शेजाऱ्या लिबियातील अस्थिरता वाढत असल्याने टु्यनिशियातील सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. ट्युनिशयातील ३ हजार लोक सिरिया आणि इराकमधील इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाले आहेत. ते ट्युनिशियात परतल्यानंतर हल्ले करू शकतात, अशी भीती आहे.हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी पर्यटकांना ओलिस ठेवले की काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराच्या गणवेशातील तिघांनी काही पर्यटकांना ओलिस ठेवले असावे. पोलंडच्या विदेश मंत्रालयानुसार जखमींमध्ये पोलंडच्या तिघांना समावेश आहे.
ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला; २१ ठार
By admin | Published: March 18, 2015 11:41 PM