तेहरान - इराणमधील चाबहार आणि रस्क शहरात दहशतवाद्यांनी हल्ले केले असून यात ११ सुरक्षा कर्मचारी आणि १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १० सुरक्षा अधिकारीही जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री हा हल्ला झाला, मात्र हल्ल्याची माहिती उशिराने समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-अल-अदलच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. मृतांमध्ये २ पोलिस अधिकारी, २ बॉर्डर गार्ड्स आणि ७ सैनिकांचा समावेश आहे. इराणचे मंत्री माजिद मिराहमादी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना चाबहारमध्ये असलेल्या बॉर्डर गार्ड्सच्या मुख्यालयाचा ताबा घ्यायचा होता. मात्र त्यांना ताबा घेण्यात अपयश आले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून १५ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आल्याचे इराणने म्हटले आहे. इराणवरील हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे.