तेल अविव - इस्राइलमधील एलाद येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. इस्राइल आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच हा हल्ला झाला. इस्राइलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, या हल्लेखोरांचा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवाद्यांनी सेंट्रल पार्कमध्ये कुऱ्हाडी आणि चाकूने अनेक जणांवर हल्ला केला. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला इस्राइलच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर करण्यात आला. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पार्कमध्ये जमले होते.
दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे. इस्राइलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना आणि त्यांची मदत करणाऱ्यांना पकडले जाईल. तसेच या दहशतवाद्यांना त्यांनी केलेल्या कृत्याची किंमत मोजावी लागेल.
दरम्यान, दहशतवादी संघटना असलेल्या हमासने या हल्ल्याचे कौतुक केले आहे. तसेच येरुसलेममध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराशी त्याला जोडले आहे. हमासने सांगितले की, अल अक्सा मशिदीवरील हल्लेखोरांना सोडले जाणार नाही.