ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 04 - ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (Lone-Wolf) करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे युरोपात हल्ले करणा-यांनी इसीसपासून प्रभावित होऊन एकट्याने दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे. इसीस भारतामध्येही अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी लोकांना भडकवत आहे.
'भारतातील मुस्लिमांना आता पुढे आलं पाहिजे, युरोपप्रमाणे भारतातही प्रशासन आणि पोलीस अधिका-यांची हत्या केली पाहिजे', असं भडकाऊ वक्तव्य अल-कायदाचा भारतीय उपखंडातील प्रमुख असीम उमर याने केलं आहे. अल-कायदा गेली 2 वर्ष भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत त्यांना हवं तसं यश मिळालेलं नाही.
अमेरिकेने नुकतंच भारतीय उपखंडातील अल-कायदा संघटनेला परदेशी दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं असून, असीम उमरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. अल-कायदा आणि इसीस भारतात हल्ले करण्यासाठी भारतीयांना भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभुमीवर गुप्तचर यंत्रणाही सज्ज झाली आहे.
अल-कायदा एकटे हल्ले करण्यासाठी ओळखली जात नाही. मात्र भारतीय उपखंडात इसीसची वाढती लोकप्रियता पाहता अल-कायदा या पर्यायाचा विचार करत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय उपखंडातील अल-कायदा आणि इसीसमधील शत्रुत्व जगजाहीर आहे. दोन्ही दहशतवादी संघटना उपखंडात मुख्यत: भारत आणि बांगलादेशमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानधील दहशतवादी संघटनांनी याठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं.
'अल-कायदा आणि इसीस एकट्याने हल्ला करण्यावर भर देत आहेत. कारण मुख्यत: भारतात त्यांनी हवं तसं जाळ पसरता आलेलं नाही. एकट्याने हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणं कठीण होऊन जातं. ज्याप्रमाणे ओरलांडो हल्ल्यात अमेरिकी अधिका-यांनी ओमर मतीनबद्दल काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. भारतीय जर अशाप्रकारच्या हल्ल्यांकडे आकर्षित झाले तर यामुळे खुप मोठा धोका निर्माण होऊ शकतो', असं मत गुप्तचर खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केलं आहे.