ऑनलाइन लोकमत -
ब्रासिलिया, दि. 16 - फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात आयोजित रिओ ऑलिम्पिकदरम्यान जगभरातील खेळाडूंना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे ब्राझीलपुढे आव्हान आहे. नीसमधील हल्ल्यानंतर ब्राझीलचे कार्यकारी राष्ट्रपती मिशेल टेमर यांनी गुप्तहेर विभाग प्रमुखांची आणि कॅबिनेट सहका-याची तात्काळ बैठक बोलवित कडेकोट सुरक्षेची खात्री करून घेतली.
ब्राझीलच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख सर्जियो एचेगोयेन म्हणाले,‘फ्रान्सवरील हल्ल्यामुळे आमच्या चिंतेत भर पडली. सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने सर्वाधिक भर सुरक्षेवर देण्यात येत आहे. या बैठकीत आम्ही वाहतूक, चेक पॉर्इंट, बॅरिकेड्स आदींवर चर्चा केली’. ब्राझीलचे संरक्षणमंत्री रौल जंगमॅन यांनी देखील फ्रान्स हल्ल्यानंतर आमची चिंता वाढल्याची कबुली दिली आहे. ब्राझीलच्या गुप्तहेरांनी ऑलिम्पिकदरम्यान फ्रान्सच्या पथकावर कडव्या मुस्लिम गटाकडून हल्ला होण्याची भीती काही दिवसांआधी व्यक्त केली होती.
५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित ऑलिम्पिकसाठी ८५ हजार सुरक्षारक्षक, ४७ हजार पोलीस, ३८ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. १० हजार ५०० खेळाडू, अधिकारी व पर्यटक यांची चोख सुरक्षा व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजन समितीवर असेल.