संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भुमिकेवर सडकून टीका केली. पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरविण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळविले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. जन धन योजनेमुळे भ्रष्टाचार कमी झाला, 32 कोटी लोकांनी बँकांमध्ये खाती उघडल्याचे सांगतानाच वातावरणातील बदल आणि दहशतवाद या मोठ्या समस्या बनल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
9/11 चा न्युयॉर्कवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांतता चर्चा खंडीत झाली आहे.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण एकाची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.