लाहोर - 26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. ख्वाजा आसिफ यांनी हाफिझ सईदचा उल्लेख अमेरिकेचा डार्लिंग असा केला होता, त्यामुळे संतप्त झालेल्या सईदने आसिफ यांच्या विरोधात हा दावा ठोकला आहे. न्यूयॉर्क येथील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी हाफिझ सईदला अमेरिकेचा एकेकाळचा डार्लिंग म्हटले होते. अमेरिका आज ज्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यांच्याबरोबर 20-25 वर्षांपूर्वी डार्लिंगसारखा व्यवहार करत होती, असा आरोप त्यांनी केला होता. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, 'सध्या तो नजरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवे. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे पाकिस्तानाच अडचणीत असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केले. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असे ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. ख्वाजा आसिफ यांनी यावेळी हाफिज सईद आणि इतर दहशतवादी संघटना मोठ्या होण्यामागे अमेरिकाही तितकीच जबाबदार असल्याचं सांगितले. 'हाफिज सईदसाठी उगाच आम्हाला दोष देऊ नका. 20 वर्षांपासून त्यांना आपल्या प्रिय लोकांप्रमाणे वागवत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत बसून तुम्ही खाणे पिणं केले, आणि आता पाकिस्तानला दोष देता', असे ख्वाजा आसिफ बोलले आहेत. यावेळी अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या प्रॉक्सी वॉरला समर्थन देणं पाकिस्तानला खूपच महागात पडलं असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 8:55 AM