बार्सिलोना- गेल्या वर्षी बार्सिलोनामध्ये एका रिसॉर्टजवळ हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या हल्ल्यामध्ये 16 लोकांचे प्राण गेले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे स्पेनबरोबर संपूर्ण युरोप हादरला होता. स्पॅनिश माध्यमांनी बॉम्ब तयार करणाऱ्या दहशतवाद्याचे फोटो प्रसिद्ध केले असून त्यामध्ये तो कॅमेऱ्यात पाहून चक्क हसताना दिसत आहे.
एका फोटोमध्ये दहशतवाद्याने स्वतःच्या कंबरेभोवती स्फोटके गुंडाळली असून तो हसतहसत आकाशाकडे बोट दाखवत आहे तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये दोन दहशतवादी कॅमेऱ्यात पाहून स्मित करत आहेत. तसेच आयफेल टॉवरकडे बोट दाखवणाऱ्या दहशतवाद्याचेही छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्फोटके तयार करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये एक 22 वर्षांचा युनूस अबायाकूब असून त्याने ला राम्ब्लास येथिल किनाऱ्यावरील लोकांच्या गर्दीमध्ये व्हॅन घुसवली होती. त्यात 16 लोकांचे प्राण गेले होते. त्यानंतर त्याने एका व्यक्तीला सुऱ्याने भोसकले.
या लोकांनी बार्सिलोनापासून 200 किलोमीटर अंतरावरील अल्कानार या गावातील घरामध्ये बसून ही स्फोटके तयार केली होती. त्या पडझड झालेल्या घरातून ही छायाचित्रे ला रेझन या स्पॅनिश वर्तमानपत्राने मिळवली आहेत. ज्या दिवशी बार्सिलोनामध्ये हल्ला करण्यात आला त्याच संध्याकाळी या घरात स्फोट घडवला गेला आणि त्याक दोन दहशतवादी ठार झाले. आयसीसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्याशी संबंधित 6 मोरक्कन तरुणांना पोलिसांनी कंठस्नान घातले. हे सर्व तरुण 17 ते 24 वयाचे होते.