जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरख्या असलेल्या मसूद अझहरने 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाषण देत भारत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांविरोधात गरळ ओकली आहे. त्याने दोन्ही देशांविरोधात नव्याने जिहादी छेडण्याची शपथ घेतली आहे. मात्र, मसूद अझहरने हे भाषण केव्हा आणि कुठे दिले, यासंदर्भात जैश-ए-मोहम्मदने माहिती दिलेली नाही. पण मसूदचा हा उघड्यावरील व्हिडिओ समोर आल्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. जैश ए मोहम्मद आपले विचार जगभरात पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील चलाते, यावरच मसूदचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
'द प्रिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका भारतीय इंटेलिजन्स अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हे भाषण शक्यतो गेल्या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानातील बहावलपूरच्या बाहेर हजार एकरात पसरलेल्या उम्म-उल-कुरा मदरसा आणि मशीद परिसरात देण्यात आले आहे. येथे प्रशासकीय ब्लॉक आणि अनेक निवासी ब्लॉकही आहेत. भाषणादरम्यान अझहरने लोकांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासही सांगितले. यानंतर तेथे उपस्थित दहशतवाद्यांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. यावेळी मसूद वेळोवेळी 'भारत तेरी मौत आ रही है' अशा घोषणा देत राहिला.
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्याबद्दलही ओकली गरळ -दहशतवादी अझहर मसूद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासंदर्भात बोलताना म्हणाला, "मला लाज वाटते की, मोदींसारखा कमकुवत माणूस आपल्याला आव्हान देतो अथवा नेतान्याहूसारखा उंदीर आपल्याला आव्हान देतो. मला सांगा, माझी बाबरी मशीद परत मिळवण्यासाठी 300 लोकही नाहीत का?" भारताला धमकावत दहशतवादी मसूद पुढे म्हणाला, आम्ही तुम्हा सर्वांना अशा शक्तिशाली बंदुकांसह काश्मिरात पाठवू की, सर्व टेलिव्हिजन अँकरही हादरतील आणि ही शस्त्रे कुठून आली? असे विचारतील.