वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना अभयासोबत आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानचा समावेश करून पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांच्या राजरोसपणे पाकिस्तानच्या भूमीतून कारवाया चालू असून, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासह संघटित करण्यासोबतच संघटनांसाठी पाकिस्तानमध्ये निधीही गोळा करतात, असे अमेरिकेने म्हटले आहे.दहशतवाद यावरील वार्षिक अहवाल विदेश मंत्रालयाने संसदेला सादर केला असून, यात अगदी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेविरुद्ध पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दले कारवाई करीत आहे. तथापि, अफगाण तालिबान आणि हक्कानी यासारख्या संघटनेविरुद्ध ठोस कारवाई करताना दिसत नाही. हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तैयबा आणि जैश यासारख्या अनेक दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तानमधून कारवाया बिनबोभाट चालू आहेत. लष्कर-ए-तैयबावर पाकिस्तानने बंदी घातली आहे. तथापि, हीच संघटना जमात-उद-दावा या नावाने आणि फलाह-ई-इन्सानियत फाऊंडेशन उघडपणे निधी गोळा करतात. लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफीज सईद तर अगदी उजळमाथ्याने ठिकठिकाणी भाषणे करून चिथावणी देत आहे. एवढेच नाहीतर पाकिस्तानने २०१५ मध्ये दिलेला शब्द पाळला नाही. या दोन्ही संघटनांवर बंदी न घालता त्यांच्या कारवायांवर फक्त लक्ष ठेवून आहे.अफगाणिस्तान, सोमालिया, विस्तीर्ण सहारा, सुलू, सुलावेसी, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे देशही दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत आहेत. पाकमधून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले केले जातात, असा स्पष्ट आरोप भारत सज्जड पुराव्यानिशी वारंवार करीत आला आहे.
दहशतवाद्यांना पाकमध्ये आश्रय अन् अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:12 AM