पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचे विसर्जन करण्यात आले आहे. यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन केले जाणार आहे. परंतू, त्यापूर्वीच माजी कॅबिनेट मंत्री शिरीन मजारी यांची मुलगी इमान मजारीचे अपहरण झाले आहे. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
इमान मजारी ही एक रात्र आधीच पाकिस्तानी सैन्याच्या विरोधातील इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफच्या आंदोलनात सहभागी झाली होती. या रॅलीमध्ये इमानने पाकिस्तानी सैन्यातच दहशतवादी बसले आहेत, अशी टीका केली होती. या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी इम्रान खान यांना लवकरात लवकर सोडा अशी मागणी करण्यात आली.
या रॅलीनंतर लगेचच शिरीन मजारी यांच्या मुलीचे इमानचे अपहरण झाले. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये शिरीन मजारी या मानवाधिकार मंत्री होत्या. तथापि, 9 मे रोजी इम्रान खानच्या अटकेनंतर, लष्करी संस्थांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पीटीआयशी संबंध तोडले होते. रात्री आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप शिरीन मजारी यांनी केला आहे.
महिला पोलिस आणि काही साध्या वेशातील लोकांनी आमच्या घराचा दरवाजा तोडून माझ्या मुलीला पळवून नेले आहे. त्यांनी आमचे सुरक्षा कॅमेरे, लॅपटॉप आणि मुलीचा फोन काढून घेतला आहे. संपूर्ण घर तपासले. माझी मुलगी तिच्या रात्रीच्या ड्रेसमध्ये होती. तिने कपडे बदलण्याचे त्यांना सांगितले. परंतू, त्या लोकांनी तिला तसेच ओढून नेले आहे, असा आरोप शिरीन यांनी केला आहे. त्यांच्याकडे कोणतेही वॉरंट नव्हते आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नव्हती. ही सरकारची हुकूमशाही आहे. लक्षात ठेवा आम्ही दोन स्त्रिया घरी राहतो. हे एक प्रकारचे अपहरण आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.