ऑनलाइन लोकमत
पेशावर (पाकिस्तान), दि. १८ - पाकिस्तानी तालिबानच्या दहशतवाद्यांनी पेशावरमधल्या पाकिस्तानी विमान दलाच्या तळावर सशस्त्र हल्ला चढवला आहे. या हल्ल्यामध्ये १३ दहशतवाद्यांसह एकूण ३० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला असून दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई संपुष्टात आल्याचे पाकिस्तान लष्कराने सांगितले. एकूण १३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्करी अधिका-यांनी सांगितले असून गेल्या अनेक आठवड्यांमधला हा सगळ्यात मोठा हल्ला मानण्यात येत आहे. हवाई दलाच्या तळावर असलेल्या मशिदीमध्ये १६ जण नमाज पढत होते, हे सर्वजण दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याचे मेजर जनरल असीम बाजवांनी सांगितले. १३ जणांच्या दहशतवाद्यांनी दोन गट केले आणि दोन बाजुंनी हल्ला केला. लष्कराच्या जवानांनी लगेचच त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि धुमश्चक्री झाली. आज सकाळी हा हल्ला झाला आणि दुपारी १२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. पाकिस्तानी लष्कराचे एकूण १० जवान जखमी झाले असून त्यामध्ये दोन अधिका-यांचा समावेश आहे तर पाकिस्तानी सैन्याचा कप्तान असफंदियार मरण पावला आहे.