मॉस्को : दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळेच गेल्या महिन्यात इजिप्तच्या सिनाय प्रांतात विमान कोसळल्याची कबुली मंगळवारी रशियन सरकारने दिली. या घातपातात विमानातील सर्व २२४ जण ठार झाले होते. या घातपातास जबाबदार असणाऱ्यांचा बदला घेण्याची घोषणा नंतर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली.या घातपाती कृत्याबद्दल पुतीन यांनी स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नाही. तथापि सिरियात रशियाने चालविलेली बॉम्बफेक आणखी तीव्र केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.पुतीन यांनी ही घोषणा करण्यापूर्वीच संबंधित घातपातास जबाबदार असणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके बक्षीस देण्याची घोषणा रशियन सुरक्षा संस्थेने केली. देशाच्या सुरक्षा प्रमुखांशी झालेल्या चर्चेत बोलताना पुतीन म्हणाले की, दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याशी रशिया प्रथमच लढा देत आहे, असे नव्हे. सिनायमध्ये झालेल्या आमच्या लोकांचा रक्तपात हा सर्वात भयावह आहे. आम्ही आमच्या या नागरिकांचे रक्त आणि त्यांच्या नातलगांचे अश्रू वाया जाऊ देणार नाही. जगाच्या पाठीवर ते कोठेही लपून बसलेले असले तरीही आम्ही त्यांना शोधून काढू आणि ठेचू.१ किलोचा टीएनटीचा बॉम्बहे विमान आपणच पाडल्याचा दावा ‘इसिस’ने केला असून रशियाच्या आजच्या कबुलीने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या विमानात १ कि.ग्रॅ. टीएनटीचा बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि तो ‘विदेशी बनावटी’चा होता, अशी माहिती रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख बॉरशिनकोव्ह यांनी या बैठकीत सांगितले.या भयंकर गुन्ह्यामागे हात असलेल्यांची माहिती देणाऱ्यास ४० दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली. या घटनेनंतर रशियाने इजिप्तला जाणारी सर्व विमान उड्डाणे स्थगित केली होती.पर्यटकांना घेऊन जाणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटन यांनी ते घातपातामुळेच कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला होता. मात्र त्यावेळी रशियाने तो निष्कर्ष फेटाळून लावला होता. शेवटी रशियानेच तशी कबुली दिली.या घटनेमागील गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी व त्यांना शिक्षा ठोठावण्यासाठी परदेशात असलेल्या रशियाच्या सर्व मित्रांचे साह्य घेण्याचे आदेश पुतीन यांनी दिले आहेत. तुर्कस्तानात जी-२० राष्ट्रांच्या शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आणि अन्य जागतिक नेत्यांशी चर्चा करून मायदेशी परतल्यानंतर लगेचच पुतीन यांनी सुरक्षा संस्थांची बैठक घेतली आणि घातपातामुळेच विमान कोसळल्याची घोषणा केली.यापूर्वी २००४ मध्ये नॉर्थ कॉकेशस प्रांतात बेसलान येथील शाळेत इस्लामी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर हत्याकांड केले होते. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यात प्रथमच रशियन नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली आहे.
दहशतवाद्यांनीच विमान पाडले
By admin | Published: November 18, 2015 3:48 AM