वॉशिंग्टन - स्पेसएक्स आणि टेस्लाचे संस्थापक एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी मानवी सभ्यतेच्या अंतासंदर्भात इशारा दिला आहे. या अमेरिकन अब्जाधीश उद्योगपतीने घटत्या जन्मदरामुळे जागतिक लोकसंख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या लवकरच आठ अब्जांवर पोहोचणार आहे. मात्र असे असतानाही, पृथ्वीवर पुरेसे लोक नाहीत, असा मस्क यांचा विश्वास आहे. एवढेच नाही, तर माझे शब्द लिहून ठेवा, हे नक्की होणार, असेही मस्क यांनी म्हटले आहे.
द लॅन्सेटच्या अध्ययनात लोकसंख्येवर खुलासा -सायन्स जर्नल द लॅन्सेटच्या एका अध्ययनानुसार, 2064 मध्ये जगाची लोकसंख्या 9.7 बिलियनपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. तर, काही तज्ज्ञांनी असेही भाकीत केले आहे, की सन 2100 पर्यंत पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या 8.8 अब्जांवर येईल. यानंतर येणाऱ्या शतका पृथ्वीवरील लोकसंख्या आणखी कमी होईल.
बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे, की जगाच्या अनेक भागांत लोकसंख्येची घनता अधिक आहे. या उलट, एलन मस्क यांचे म्हणणे आहे की आपण अजूनही नव्या जीवनाची निर्मिती करणे सुरूच ठेवायला हवे अथवा परिणामांना सामोरे जायला हवे. मस्क यांनी, अमेरिकेत झपाट्याने कमी होत असलेल्या स्थानिक लोकसंख्येवरही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले कृपया आकडे बघा. जर लोकांना आणखी मुले झाली नाही, तर सभ्यतेचा समतोल ढासळेल. माझे शब्द लिहून ठेवा.
'पृथ्वीवर पुरेसे लोक नाहीत, लोकांनी मुलांना जन्माला घालणे सुरूच ठेवावे' -वॉल स्ट्रीट जर्नलसोबत बोलताना मस्क दावा करत म्हणाले, "पृथ्वीवर पुरेसे लोक नाहीत. मी फारसा आग्रह करू शकत नाही, पण पुरेसे लोक नाहीत." माझ्या मते, सभ्यतेसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे कमी विकास दर आणि वेगाने घसरणारा विकास दर आहे. मात्र, तरीही एवढे सारे लोक, ज्यांत हुशार लोकही आहेत, विचार करतात की, जगात मोठ्या प्रमाणावर लोक आहेत आणि लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जात आहे. हे पूर्णपणे उलटे आहे." महत्वाचे म्हणजे स्वतः एलन मस्क यांना सहा मुले आहेत.