Tesla Driver Using VR Headset: आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः कार सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. जगभरातील आघाडीच्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपल्या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ऑटोपायलट, ॲडव्हान्स्ड ऑटोपायलट किंवा सेल्फ ड्रायव्हिंग व्हेईकल यांसारखे तंत्रज्ञान आले आहे. अशातच अमेरिकेतील रस्त्यांवर असे दृश्य पाहायला मिळाले, ज्याने अमेरिकन सरकार अलर्ट झाले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती डोळ्यांवर Apple VR हेडसेट घालून Tesla सायबर ट्रक चालवताना दिसतोय. यावेळी तो व्यक्ती फक्त हाताने इशारे करुन कार चालवतोय. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. लोकांनीही रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
यूएस सरकारमधील वाहतूक विभागाचे सचिव पीट बुटिगिएग यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, ड्रायव्हर्सने वाहन चालवताना नेहमी लक्ष दिले पाहिजे. आज प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टम्स उपलब्ध आहे, पण ड्रायव्हरने नेहमी कारचे नियंत्रण त्याच्या हातात ठेवायला हवे.