अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली आहे. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या गोळीबारात तीन शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या राज्यपालांनी याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आता आपल्याला कारवाई करावीच लागेल असे म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये अधूनमधून माथेफिरू शाळांमध्ये घुसून गोळीबार करण्याच्या घटना घडत असतात. परंतू ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना मानली जात आहे. एका १८ वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला आहे. त्याने स्वत:वरही गोळी मारली आहे. दुपारच्यावेळी ही घटना घडली आहे. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने फोर्स तिथे पाठविण्यात आली. परंतू तोवर उशिर झाला होता. मुलांच्या पालकांना शाळेच्या कॅम्पसमध्ये न जाण्याचे सांगण्यात आले आहे.
२०१२ मध्ये सँडी हुक प्राथमिक विद्यालयात देखील असाच गोळीबार झाला होता. यामध्ये २० मुलांचा मृत्यू झाला होता. याच्यासारखीच परंतू त्यापेक्षा जास्त खतरनाक हा हल्ला असल्याचे टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले. आरोपीने दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांवर गोळ्या चालविल्या.
या गोळीबारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. २० एप्रिल १९९९ मध्ये देखील असाच भीषण हल्ला झाला होता. हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी रायफली, पिस्तूल आणि स्फोटके घेऊन शाळेत हल्ला केला होता. यामध्ये १२ वर्गमित्रांचा मृत्यू झाला होता. तसेच २१ जण जखमी झाले होते.