टेक्सास : आपल्या फायद्यासाठी एक आई इतकी कशी निर्दयी ठरु शकते, अशीच काहीशी तुमची यावर प्रतिक्रिया राहिल. आपल्या लहान मुलांना एकटं कारमध्ये सोडून जाणं आणि बेजबाबदार वागणं किती महागात पडू शकतं. याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. एक आई आपल्या दोन लहान मुलींना कारमध्ये ठेवून पार्टीला गेली आणि दोन्ही चिमुकल्या मुलींचा कारमध्ये तापमान वाढल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
टेक्सास येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. यात या बेजबाबदार आईला ४० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टात सांगितले की, ७ जून २०१७ ला अमांडा हॉकिन्स कार ड्राईव्ह करत होती. यावेळी तिच्यासोबत १ आणि २ वर्षांच्या दोन्ही मुलीही होत्या. या महिलेने आपला बचाव करण्यासाठी सांगितले की, दोन्ही मुलींचा मृत्यू तापमान वाढल्याने नाही तर फूलांच्या गर्द सुगंधामुळे झालाय.
मात्र, पोलीस म्हणाले की, फूलं मुलींच्या मृत्यूचं कारण नाही. खरं हे आहे की, महिला दोन्ही मुलींना कारमध्ये बंद करुन रात्रभर पार्टी करायला गेली. पोलिसांनुसार, दोन्ही मुली साधारण १५ ते १८ तास कारमध्येच होत्या आणि कारचं तापमान ९० डिग्रीच्या वर गेलं होतं. अशात दोन्ही मुलींचा मृत्यू कारच्या आत भाजल्याने आणि गुदमरुन झाला.
दरम्यान रात्री कारमधून एका व्यक्तीला लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आला. त्या व्यक्तीने या महिलेला सूचनाही केली. पण महिलेने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते ठीक असल्याचं सांगितलं. पोलिसांनुसार, दुसऱ्या दिवशी दुपारी हॉकिन्स झोपून उठल्यावर तिला मुलींबाबत आठवलं आणि ती त्यांना बघण्यासाठी गेली.
या महिलेला वाटलं की, मुली कारमध्येच झोपल्या असतील. पण तिने दरवाजा उघडला तेव्हा दोन्ही मुली मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनुसार, या महिलेला पार्टीमध्ये कोणताही अडसर नको होता. त्यामुळे ती या दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी जात होती. हॉकिन्सने मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्यावेळी गुगलही केलं होतं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर न्यायधीशांनी या प्रकरणी महिलेला ४० वर्षांची शिक्षा सुनावली.