बँकॉक- थायलंडची युवा फुटबॉल टीम अजूनही गुहेमध्येच अडकून पडलेली आहे. गेले तीन दिवस हा संघ एका गुहेमध्ये अडकून पडलेला आहे. हे खेळाडू आणि त्यांचा प्रशिक्षक अजूनही जिवंत असावेत अशी आशा थायलंडच्या उपपंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
हे सर्व खेळाडू 11 ते 16 वयाचे असून शनिवारी त्यांनी चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये प्रवेश केला होता. मंगळवारी नौदलाच्या पाणबुड्यांनी या मुलांचा पुन्हा शोध सुरु केला आहे. गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. ही मुले जिवंत सापडतील. त्यांच्याकडे खायला काहीही नसले तरी पिण्यासाठी पाणी आहे अशा शब्दांमध्ये थायलंडच्या उपपंतप्रधानांनी आशा व्यक्त केली आहे. नौदलाचे 17 पाणबुडे त्यांचा शोध घेत आहेत. या खेळाडूंच्या नातलगांनी गुहेच्या बाहेर गर्दी केली असून खेळाडूंच्या संरक्षणासाठी प्रार्थना सुरु केली आहे.
चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहात आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले. ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
या गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो असे बँकॉक पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र पावसाळ्यात याच प्रवाहामुळे गुहेत जाणे अशक्य होते. पावसाळ्याचे जून ते ऑक्टोबर हे पाच महिने या प्रवाहाला पूर आला तर पाच मीटर्स म्हणजे 16 फूट पाणी गुहेत साचू शकते असे पोलीस कर्नल कोम्सान सार्दलुआन यांनी सांगितले.