बँकॉक : गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करणा-या एका ठकसेनाला थायलंडमधील न्यायालयाने तब्बल ६,६३७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘पॉन्झी’ योजना चालवून सुमारे ४० हजार लोकांची १६ कोटी डॉलरची फसवणूक केल्याबद्दल पुदित कित्तीथ्राडिलोक या ३४ वर्षांच्या आरोपीवर खटला भरण्यात आला होता. न्यायालयाने फसवणुकीच्या २,६५३ गुन्ह्यांसाठी त्याला स्वतंत्रपणे दोषी ठरवून एकूण १३,२७५वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र नंतर या ३४ वर्षांच्या ठकसेनाने गुन्हे कबूल करून दयेची याचना केल्यावर त्याची शिक्षा निम्म्याने कमी करून ६,६३७ वर्षांची करण्यात आली.पुदित याच्या दोन कंपन्यांना प्रत्येकी २० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला गेला. तसेच २,५५३ गुंतवणूकदारांकडून फसवणुकीने घेतलेली १७ दशलक्ष डॉलरची रक्कम ७.५ टक्के व्याजासह त्यांना परत करावी, असाही आदेश दिला गेला. (वृत्तसंस्था)
थाई ठकसेनाला झाली ६ हजार वर्षांची कैद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 2:09 AM