ऑनलाइन लोकमत
थायलंड, दि. 24- दक्षिण थायलंडमधल्या पट्टानी या समुद्रकिना-याला लागून असलेल्या हॉटेलचा परिसर दोन बॉम्बस्फोटांनी हादरला. पहिला बॉम्बस्फोट दक्षिणी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पार्किंग लॉटमध्ये झाला आहे. मात्र त्या बॉम्बस्फोटात कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरा बॉम्बस्फोट हा हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये झाला असून यात एकाचा मृत्यू झाला, तर 30हून अधिक जण जखमी झाले आहे.बॉम्बस्फोटाच्या जवळच कराओके बार आणि मालिश सेंटरचा गजबजलेला परिसर असल्यामुळे जखमींसह मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच थायलंडमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 4 जणांचा मृत्यू आणि डझनांहून अधिक जण जखमी झाले होते. थायलंडला पर्यटनाच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळतं असल्यामुळेच हे हल्ले करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दक्षिण थायलंडमध्ये झालेल्या या बॉम्बहल्ल्यांची अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली नाही.
मात्र पोलिसांनी थाडलंडमधल्या बंडखोरांनीच हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2004साली थायलंडमधील लष्कर आणि बंडखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध झालं होतं. या युद्धाची झळ मलेशियाच्या सीमावर्ती भागात असलेल्या नागरिकांनाही बसली होती. त्या युद्धात 6500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.