बँकॉक- थायलंडमधील गुहेमध्ये अडकलेल्या फूटबॉल खेळाडूंना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम अजूनही सुरु आहे. जगभरातील विविध देशांनी या मुलांना वाचविण्यासाठी सहकार्य केले आहे. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. इतकेच नव्हे तर अंतराळ उद्योजक एलन मस्कनेही आपल्या मिनिसबचा वापर करुन मदत देऊ केली आहे.
या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 8 मुलांना दोन दिवसांमध्ये बाहेर काढणे शक्य झाले, तर आज आणखी दोन मुलांना बाहेर काढण्यात आले. असे एकूण दहा मुलांना वाचविण्यात यश आले आहे.
2 जुलै रोजी थायलंडमधील भारतीय दूतावासाने या मुलांच्या मदतीसाठी आपले तंत्रज्ञ तयार आहेत असे थायलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला कळवले होते. भारताचे थायलंडमधील राजदूत भगवंतसिंह बिश्नोई यांनी प्रकरणात विशेष लक्ष घालून मदतीची तयारी दर्शवली होती. त्यांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल थायलंडचे भारतातील राजदूत गोंगस्काडी यांनी ट्वीटरवरुन थँक्यू अॅम्बॅसडर बिश्नोई, थँक्यू इंडिया असे ट्वीट केले.किर्लोस्कर ब्रदर्सची बँकॉकमध्येही कंपनी कार्यरत असून थायलंडच्या सरकारबरोबर आजवर अनेकदा या कंपनीने काम केले आहे. ख्लाँग बँग सू ड्रेनेज प्रोजेक्ट तसेच बुंग बोराफेट येथे जलसंपादन विभागाबरोबर या कंपनीने काम केले आहे. तसेच 2011 साली बँकॉक येथे आलेल्या पुराच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी कंपनीने पंप दिले होते.