ऑनलाइन लोकमत -
बँकॉक, दि. 12 - थायलंडमधल्या हुआ हिन येथील एका रिसॉर्टमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. सुरुवातीला झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर 19 लोक जखमी झाले होते. जखमींमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. स्फोटांची ही मालिका एवढ्यावरच थांबली नाही. थोड्या वेळाने अजून दोन बॉम्बस्फोट झाले ज्यामुळे मृतांचा आकडा चारवर पोहोचला. स्फोटकं फुलांच्या कुंड्यांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. मोबाईलच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या अंतराने हे स्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार महिला फूड स्टॉलच्या दिशेने जात असताना स्फोटामुळे तिचा मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. थायलंडमध्ये पर्यटनस्थळ अनेकवेळा निशाण्यावर असतात.
'ब्लास्ट झाला तेव्हा मी जवळच होतो. लोक बॉम्ब म्हणून ओरडत होते. मी लोकांचा आवाज ऐकला पण स्फोटाचा आवाज मला आला नाही. मी मदत करण्यासाठी धाव घेतली तेव्हा 10 लोक जखमी अवस्थेत पडले होते. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते', अशी माहिती एका व्यक्तीने बीबीसीला दिली आहे.