बँकॉक - थायलंडमधील एका न्यायाधीशाने भर कोर्टात छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येच्या एका प्रकरणात संशयितांना मुक्त केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. तसेच न्यायाधीशांनी फेसबुक लाईव्हवर भाषण करून न्यायप्रणालीवर देखील ताशेरे ओढले आहेत.
थायलंडचीन्यायालये बहुतांश वेळा श्रीमंत लोकांच्या बाजूने काम करतात. सामान्य माणसांना लहान-लहान गुन्ह्यांसाठी तातडीने कठोर दंड दिला जातो असा आक्षेप टीकाकार नेहमी करतात. परंतू एखाद्या न्यायाधीशांनी अशाप्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंडखोरीने प्रभावित असलेल्या दक्षिण थायलंडमधील याला न्यायालयात न्यायाधीश कनाकोर्न पियानचाना यांनी भर कोर्टात स्वत: वर गोळी झाडली. त्याआधी त्यांनी एका हत्या प्रकरणात पाच संशयितांबाबतचा निर्णय सुनावला होता. त्यांच्या कक्षात सुनावणी झाल्यानंतर त्यांनी सर्व आरोपींना मुक्त केले व लगेच बंदूक काढून आपल्या छातीत गोळी झाडली आहे.
न्यायपालिकेच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर न्यायाधीशांवर उपचार करत असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. व्यक्तीगत तणावातून त्यांनी गोळी झाडली असल्याची माहिती मिळते. मात्र तणावामागील कारण अस्पष्ट आहे. आतापर्यंत कोणत्याही न्यायाधीशाने व्यापक न्यायप्रणालीबाबत असे वक्तव्य करून शिष्टाचार मोडलेला नाही. न्यायालयात संशयितांची बाजू मांडणाऱ्या एका वकिलाने सांगितले की, न्यायाधीश कनाकोर्न पियानचाना यांनी सरकारी पक्षाचे पुरावे फेटाळले व शिक्षा सुनावण्यासाठी ठोस पुरावे नाहीत असं म्हटलं होतं.
न्यायप्रणालीवर ओढले ताशेरे
आपल्या फेसबुकवरून फेसबुक लाईव्ह करताना न्यायाधीशांनी न्यायालयाला संबोधित केले व म्हटले की, कोणालाही शिक्षा सुनावण्यासाठी स्पष्ट व विश्वसनीय पुराव्यांची गरज असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आश्वस्त होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना दंडीत करू नये. मी आज मुक्त केलेल्या पाच आरोपींनी अपराध केलेला नाही असे माझे म्हणणे नाही. तसे असेलही कदाचित... परंतू अनेकांना बळीचा बकरा बनवून दंडित करणारी न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि विश्वास ठेवण्यायोग्य करण्याची गरज आहे.