एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर ती व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतात. प्रेम म्हणजे दोन नात्यांमधील जिव्हाळा. याच प्रेमासाठी भारतापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीनं जे केले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. भारतात राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी थायलँडहून तो थेट रबरी बोट घेऊन निघाला. मागील २ आठवडे समुद्रात प्रवास करत होता. थायलँडच्या किनारपट्टीपासून तो ५० मैल अंतरावर आला होता.
या व्यक्तीचं नाव होआंग हुंग असं आहे. तो व्हिएतनामला राहतो. फुकेत द्विप ते थाई हॉलिडे आयलँडपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. प्रेमासाठी त्याने समुद्रात २००० किमी अंतर कापण्याचं ठरवलं. मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी त्याने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. अथांग समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याची जिद्द उराशी बाळगली होती. तो रबरी बोटीनं पाण्यात उतरला आणि केवळ सोबतीला काही अन्नपदार्थ ठेवले. परंतु समुद्रातून प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे नेव्हिगेशन सिस्टम नव्हती.
होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि समुद्रात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या नौदलाला माहिती दिली. त्यानंतर नेव्हीच्या जवानांनी होआंगला पकडलं. थाय मेरिटाइम इंफोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सोंगटान यांच्यानुसार, हुंगने सांगितले की, तो त्याच्या पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी मुंबईत काम करते. कोविड १९ मुळे गेल्या २ वर्षापासून तो पत्नीपासून लांब राहतोय.
इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडे कुठलाही मॅप, जीपीएस अथवा कपडे आढळले नाही. केवळ मर्यादित पाणीसाठा होता. होआंग सुरुवातीला बँकॉकला गेला होता. परंतु विना व्हिसा तो भारतात जाऊ शकत नाही हे त्याला कळालं. त्यानंतर तो फुकेतला पोहचला त्याने एक नौका खरेदी केली. होआंग फुकेत किनाऱ्याहून ५ मार्चला निघाला होता. परंतु समुद्रातील बदलत्या हवेमुळे तो मध्यभागी भरकटला. त्यामुळे गेल्या २ आठवड्यात कमी अंतर पार केले आणि त्यामुळे तो आम्हाला सापडला असं कॅप्टन यांनी सांगितले. थाय अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी त्याला फुकेतला नेले आहे. आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप काहीही उत्तर आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.