नेतेमंडळींना पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा गोंधळात टाकणारे काही प्रश्न विचारले जातात. अशावेळी काही जण त्यांना उत्तरं देणं सोयीस्कररित्या टाळतात. तर काही प्रश्न विचारल्यावर बिथरतात, संतापतात. अशीच एक घटना थायलंडमध्ये घडली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर थायलंडचे पंतप्रधान चिडले आणि त्यांनी पत्रकारांवर थेट सॅनिटायझर फवारल्याची घटना समोर आली आहे. मंत्रिमंडळासंबंधित एक प्रश्न विचारला असता प्रयुत चान-ओचा संतापले आहेत.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा प्रत्येक आठवड्यात पत्रकार परिषद घेतात. अशाच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत उत्तरे दिली. मात्र, त्याच वेळी एका पत्रकाराने मंत्रिमंडळाविषयी प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान बिथरले. आपल्या पोडियमजवळील सॅनिटायझर पत्रकारांवर फवारू लागले. प्रयुत चान-ओचा यांनी यावेळी पत्रकारांना तुम्ही स्वत:च्या कामाचे पाहा, मला माझे काम करू द्या, असंही म्हटलं. तसेच ओचा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
प्रयुत चान-ओचा हे याआधी थायलंडच्या लष्करात कमांडर होते. 2014 मध्ये थायलंडमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हटवून त्यांनी सत्ता काबीज केली होती. याआधीदेखील पंतप्रधानांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच एका पत्रकार परिषदेत प्रश्नावर नाराज झालेल्या ओचा यांनी पत्रकारावर केळ्याचे साल फेकले होते. थायलंडमध्येही सरकारविरोधात सध्या निदर्शने सुरू आहेत. थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.