अमेरिकेत आज एक विचित्र घटना घडली आहे. रडारलाही न सापडणारे अमेरिकेचे खतरनाक लढाऊ विमान हवेत बेपत्ता झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या एअरबेस पैकी एक असलेल्या तळावरून उडालेले हे विमान कुठे गेले कोणालाच माहिती नाहीय. परंतू, या विमानाचा पायलट सापडला आहे. आता हे विमान शोधण्यासाठी मरीन कोअरने जनतेची मदत मागितली आहे.
रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. विमानातून पायलट सुरक्षित बाहेर आले होते, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. परंतू, विमान ना कुठे पडल्याची खबर ना कुणाला दिसण्याची खबर असल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. हे विमान गायब झाले कुठे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. मरीन कोअरने सध्या तरी या प्रकाराला घटनाच म्हटले आहे.
जवळजवळ ८० दशलक्ष डॉलर्सचे हे एफ-35 विमान बेपत्ता झाले आहे. जर तुमच्याकडे याबाबत काही माहिती असल्यास आमच्या शोध पथकांना मदत होईल. कृपया डिफेंस ऑपरेशन सेंटरला फोन करा, असे मरीन कोअरने ट्विट केले आहे. अमेरिकेची आर्मी चार्ल्सटन शहराच्या उत्तरेकडील दोन तलावांजवळ या विमानाचा शोध घेत आहेत.
F-35 चे उत्पादन लॉकहीड मार्टिनने केले आहे. पायलटचे नाव सध्या सार्वजनिक करण्यात आलेले नाही. F-35 चा पायलट चार्ल्सटन तळावर परतला होता, परंतू त्याच्याकडे विमान नव्हते. या तळावर अमेरिकेची सर्व प्रकारची विमाने, लढाऊ उपकरणे तैनात आहेत. मरीन कॉर्प्स एअर स्टेशन ब्युफोर्ट 6,900 एकरवर पसरलेला आहे. या लष्करी तळावर सुमारे 4700 सैनिक तैनात आहेत. येथे प्रशिक्षणही दिले जाते.