नवी दिल्ली- अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्तपणे येमेनमधील हुथी बंडखोरांच्या तळांवर मोठा हल्ला केला आहे. येमेनची राजधानी साना येथील हुथी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले असून या काळात १८ तळांना लक्ष्य करण्यात आले आहे अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. अमेरिकेने सांगितले की, हुथी दहशतवादी मालवाहू जहाजांवर हल्ले करत आहेत आणि येमेनला दिली जाणारी मानवतावादी मदत थांबवण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याशिवाय ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंडच्या सैन्यानेही हा संयुक्त हल्ला केला.
हुथी बंडखोरांवरील हल्ले आतापर्यंत हुथीच्या कृती रोखण्यात अयशस्वी ठरले आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला आहे आणि शिपिंगचे दर वाढले आहेत. ज्या देशांनी या हल्ल्यांमध्ये भाग घेतला किंवा पाठिंबा दिला त्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, येमेनमधील ८ ठिकाणी लष्करी कारवाई करण्यात आली आणि १८ हुथी तळांना लक्ष्य केले गेले.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले की, इराण समर्थित हुथी बंडखोरांची ताकद संपवणे हा या हल्ल्याचा उद्देश आहे.'आम्ही हुथी बंडखोरांना सांगू इच्छितो की जर त्यांनी त्यांचे बेकायदेशीर हल्ले थांबवले नाहीत तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. हुथी मध्य पूर्वेतील अर्थव्यवस्थांचे नुकसान करत आहेत आणि येमेन, इतर देशांना मानवतावादी मदत वितरणात व्यत्यय आणत आहेत असा आरोप त्यांनी केला.
हुथी कोण आहेत?
हुथी हा येमेनचा शिया मिलिशिया गट आहे. हा बंडखोर गट १९९० मध्ये हुसेन अल-हुथीने स्थापन केला होता. येमेनचे तत्कालीन अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून हुथींनी त्यांच्या राजवटीच्या विरोधात आंदोलन सुरू केले. ते स्वतःला 'अन्सार अल्लाह' म्हणजेच देवाचे साथीदार देखील म्हणतात. अमेरिकेच्या २००३ च्या इराकवरील आक्रमणाच्या निषेधार्थ, हुथी बंडखोरांनी 'देव महान आहे' असा नारा दिला. अमेरिका आणि इस्रायलचा नाश झाला पाहिजे, ज्यूंचा नाश झाला पाहिजे आणि इस्लामचा विजय झाला पाहिजे अशी घोषणा दिली.
२०१४ च्या सुरुवातीस, येमेनमध्ये हुथी राजकीयदृष्ट्या मजबूत झाले आणि त्यांनी सादा प्रांतावर नियंत्रण मिळवले. २०१५ च्या सुरुवातीला त्यांनी राजधानी सनाही ताब्यात घेतली. हळुहळू हुथी बंडखोरांनी येमेनच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला. हुथी बंडखोरांना इराणचे मित्र मानले जाते, कारण अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया हे त्यांचे समान शत्रू आहेत. इराणवर हुथींना आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवल्याचाही आरोप आहे.