लंडन : आईच्या गर्भात असलेल्या मुलाला चवीचे ज्ञान असते. गरोदर असलेल्या आईच्या खाण्या-पिण्याच्या सवयीनुसार गर्भातील मुलातही चवीचे ज्ञान विकसित होते. गर्भातील मुलांच्या हावभावांचा प्रथमच सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आईने कडू गोष्ट खाल्ली असेल तर गर्भातील मूल रडका चेहरा करते, असे ब्रिटनमध्ये झालेल्या या संशोधनात आढळून आले.
या संशोधनात ३२ ते ३६ आठवड्यांच्या गर्भवती असलेल्या १०० महिलांच्या गर्भातील मुलांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. डरहॅम विद्यापीठातील संशोधकांनी ३५ महिलांना कोबीची पावडर करून त्याच्या कॅप्सूल दिल्या. ३५ महिलांना गाजराच्या पावडरीच्या कॅप्सूल दिल्या, तर ३० महिलांना काहीही देण्यात आले नाही.
गाजराची कॅप्सूल खाणाऱ्या महिलांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर हसरे भाव दिसले. ज्यांनी कोबीच्या पावडरीची कॅप्सूल खाल्ली त्या महिलांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर रडके भाव दिसून आले. मुलांच्या चेहऱ्यावरील हे सारे हावभाव अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टिपण्यात आले.
कोबीची कॅप्सूल खाणाऱ्यांपैकी बहुतांश महिलांच्या गर्भातील मुलांना तो स्वाद जाणवल्यानंतर त्यांनी रडका चेहरा केला.गाजराची कॅप्सुल घेतलेल्या महिलांच्या गर्भातील मुलांना ती चव आवडली होती. ज्या महिलांनी काहीही खाल्ले नव्हते त्यांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर कोणतीही खास प्रतिक्रिया उमटलेली नव्हती.
ब्रिटनच्या संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यात आले. जन्माला आलेल्या एका अर्भकाला २००१ साली केलेल्या प्रयोगांत गाजराची चव आवडली होती. त्याला अन्य पदार्थांची चव फारशी आवडत नव्हती. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत महिलेच्या गर्भातील मुलाच्या हालचाली त्या मातेला जाणवतात असे संशोधकांनी म्हटले आहे.