इराणमधूनइस्रायल-हमास युद्धाची सर्वात मोठी बातमी येत आहे. इस्रायलने ७ ऑक्टोबरचा बदला पूर्ण केला असून हमासच्या प्रमुखाला ठार केल्याचे वृत्त येत आहे. हमासने स्वत: याची माहिती दिली असून इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माइल हानिया मारला गेल्याचे म्हटले आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने देखील याची पुष्टी केली आहे. तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे. बुधवारी पहाटे हा हल्ला करण्यात आल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे.
एप्रिल २०२४ मध्ये इस्रायलने हानियाच्या तीन मुलांना ठार केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती. यात 1,195 लोक मारले गेले होते. 250 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने हमासला संपविण्याचा विडा उचलला होता. यानंतर गाझा पट्टीवर हल्ला सुरु केला होता.
इस्रायलने अद्याप हानियाच्या मृत्यूवरून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू हमासने इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरील विश्लेषकांनीही या हल्ल्यासाठी इस्रायलला दोष देण्यास सुरुवात केली आहे.