वाॅशिंग्टन: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी न्यूयॉर्क येथील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप होते. हे सर्व आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने सांगितले. ट्रम्प यांना ११ जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सध्या ते जामिनावर आहेत. गंभीर गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आलेले ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.
२०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने तोंड बंद ठेवावे, यासाठी ट्रम्प यांनी १ लाख ३० हजार डॉलर (हश मनी) दिले होते. हे लपविण्यासाठी त्यांनी व्यावसायिक नोंदीत हेराफेरी केल्याचे न्याय मंडळाने एकमताने मान्य केले. न्यायालयाचा हा निकाल कायदेशीरदृष्ट्या ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्षपदी निवडून येण्यापासून रोखत नसला, तरी या निकालाचे महत्त्व ५ नोव्हेंबरला मतदार याबाबत काय निर्णय घेतात, यावर अवलंबून आहे.
‘हे लज्जास्पद आहे’
- जेव्हा निकाल ऐकवला गेला, तेव्हा ट्रम्प शांत, निश्चल राहिले. न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय सदोष असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
- हे लज्जास्पद आहे. एका वादग्रस्त न्यायाधीशाद्वारे केलेली ही सदोष आणि भ्रष्ट सुनावणी होती. जनता ५ नोव्हेंबरला खरा निकाल देईल. इथे काय झाले ते त्यांना माहीत आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी माझ्या देशासाठी लढत आहे. मी आपल्या संविधानासाठी लढत आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
- स्टॉर्मी डॅनियल्सने तिच्यासोबतच्या आपल्या कथित लैंगिक संबंधाची वाच्यता करू नये, म्हणून २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी तिला १ लाख ३० हजार डॉलर दिले होते. हा व्यवहार उघडकीस येऊ नये, म्हणून ट्रम्प यांनी व्यावसायिक नोंदीत फेरफार केल्याचा आरोप आहे.
- हे प्रकरण २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर ट्रम्प यांनी डॅनियलसोबतच्या लैंगिक संबंधाचे आरोप फेटाळत हे कुंभाड असल्याचा दावा केला होता.