वॉशिंग्टन :पृथ्वी आपल्या अक्षावर जवळपास १ हजार मैल प्रतितास (१,६०० किमी प्रतितास) या वेगाने फिरते. एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला २३ तास ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंद लागतात. यामुळे पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते. पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याचा वेग कमी झाल्याचा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. एका दशकाहून अधिक काळापासून हा वेग कमी होत आहे, असेच चालू राहिल्यास दिवसाचा कालावधी वाढू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
हे कधी सुरु झाले?
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार हा ट्रेंड २०१० च्या सुमारास सुरू झाला आहे. हे असेच सुरू राहिल्यास संपूर्ण ग्रहाच्या फिरण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवस रात्रीपेक्षा मोठे होऊ शकतात. प्रोफेसर विडेल म्हणाले की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते; परंतु आपल्याला ते जाणवत नाही.
येथे पोहोचणे अशक्य
- संशोधकांचे म्हणणे आहे की, मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे; अंतर्भागापर्यंत पोहोचणे अशक्य परंतु पृथ्वीच्या अं आहे. भूकंपाच्या लहरींच्या माध्यमातून या गाभ्याचा अभ्यास करता येतो.
- गाभ्यामध्ये हालचालीमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचे हानिकारक सौर विकिरण आणि वैश्विक कणांपासून संरक्षण करते.
आपल्या ग्रहाचा सर्वांत उष्ण भाग
शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याच्या गतीचे निरीक्षण केले. आतील गाभा घन असून, तो लोखंड आणि निकेलचा बनलेला आहे. हा आपल्या ग्रहाचा सर्वात उष्ण भाग आहे, जेथे तापमान ५,५०० अंश सेल्सिअस आहे. आतील गाभा चंद्राच्या आकाराचा आहे आणि आपल्या पायाखाली ३,००० मैलांपेक्षा अधिक दूर आहे.