वॉशिंग्टन : लडाखच्या सीमेजवळ चीनने सुरू केलेल्या हालचाली डोळ्यांत अंजन घालणाऱ्या आहेत. त्या भागात चीन पायाभूत सुविधा उभारत असून, त्यामुळे अतिशय सतर्क राहाण्याची गरज आहे, असा सावधगिरीचा इशारा अमेरिकी लष्कराचे पॅसिफिक भागाचे कमांडिंग जनरल चार्ल्स फ्लिन यांनी भारताचे नाव न घेता दिला आहे. हिमालय पर्वतराजीतील सीमा प्रदेशात चीनने पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. या हालचाली कशासाठी सुरू आहेत, याचा जाब कोणीतरी चीनला विचारायला हवा. एखाद्याला अस्थिर करण्याचा हेतू चीनच्या या कारवायांमागे असू शकतो. लडाखच्या सीमेनजीक चीनने चालविलेल्या हालचालींबद्दलही फ्लिन यांची तीव्र चिंता व्यक्त केली. पेगाँग तलावाजवळ चीन एक पूल बांधत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी गेल्या जानेवारीमध्ये दिले होते. चीनने चालविलेल्या या हालचालींची अतिशय गंभीर दखल भारताने घेतली होती. गलवान खोऱ्यात चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता.
भारत-अमेरिकेचा ऑक्टोबरमध्ये युद्ध सरावजनरल चार्ल्स फ्लिन म्हणाले की, यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात भारत व अमेरिकी लष्कर हिमालयातील डोंगराळ भागात सुमारे ९ ते १० हजार फूट उंचीवर युद्ध सराव करणार आहेत. मात्र, त्याची जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यानंतर अमेरिकेतील अलास्का प्रदेशात अत्यंत थंड तापमानात भारतीय लष्करातील जवानांना प्रशिक्षण दिले जाईल. या युद्ध सरावात हवाई दलाकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान, हवाई हल्ले करण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरायची माहिती व साधनसामग्री यांचा वापर दोन्ही देशांचे जवान करतील.