जगातील सर्वात खतरनाक तपास एजन्सी मानली जाणारी एफबीआय सध्या एका भारतीय तरुणाच्या शोधात आहे. हा भारतीय तरुण गुजरातमधील रहिवाशी आहे. गेल्या नऊ वर्षांपासून एफबीआय त्याचा शोध घेत आहे. मात्र अद्याप एफबीआयला त्याचा सुगावा लागू शकलेला नाही. त्यामुळे आता एफबीआयने या तरुणावर मोठे बक्षीसही ठेवले आहे.
बक्षीस इतके मोठे आहे की, त्याची माहिती देणाऱ्याचे इतक्या पैशात आयुष्य बदलू शकते. या तरुणाला शोधण्यासाठी एफबीआयने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण अद्याप त्या तरुणाचा शोध लावता आलेला नाही. अशा परिस्थितीत एफबीआयने या गुजराती तरुणावर २ लाख नव्हे तर २,०८,००,००० रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. दरम्यान, या भारतीय तरुणावर अमेरिकेत पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे आणि तेव्हापासून तो फरार आहे.
भद्रेश चेतनभाई पटेल असे आरोपीचे नाव असून तो अहमदाबादच्या वीरमगाम तालुक्यातील कात्रोडी गावचा रहिवासी आहे. भद्रेश हा पत्नी पलकसोबत अमेरिकेतील मेरीलँडमधील हॅनोवर येथे राहत होता. दोघेही एका डोनटच्या दुकानात काम करत होते. दोघेही १२ एप्रिल २०१५ च्या रात्री आपल्या ड्युटीवर होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.
या दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि यानंतर भद्रेशने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. दरम्यान, तपासाअंती एफबीआयलाच संशय आला की, दोघांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून भांडण झाले असावे. एफबीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता भद्रेशची पत्नी पलकला भारतात यायचे होते. मात्र, भद्रेशला भारतात परत यायचे नव्हते. यामुळे दोघांत वाद झाल्याचे समोर आले.
याआधी भद्रेश अमेरिकेत नेवार्क शहरात शेवटचा दिसला होता. भद्रेशनेच पत्नीची हत्या केली, याला सीसीटीव्ही फुटेजवरून पुष्टी मिळाली आहे. अमेरिकेतील मेरीलँड राज्याच्या जिल्हा न्यायालयाने भद्रेशच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. तरीही तो फरार आहे. अशा स्थितीत आता एफबीआयने त्याचा फोटो शेअर करत मोठे बक्षीस जाहीर केले आहे. भद्रेशवर एकूण अडीच लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.