नितीन राेंघे
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमधील पहिली डिबेट भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता पार पडली. साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या या डिबेटमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकमेकांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. तरीही यात ट्रम्प यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.
अटलांटा या जॉर्जिया राज्यात झालेली ही डिबेट दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची होती. कारण जॉर्जिया हे यावर्षीच्या निवडणुकीत स्विंग स्टेट म्हणजेच कुठल्याही बाजूला वळू शकणारे राज्य आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमाने हे राज्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी दोघेही नेते भरपूर प्रयत्न करत होते.
९० मिनिटांच्या चर्चेत दोघांनी वैयक्तिक हल्ले केले. बायडेन यांनी ट्रम्प यांना मूर्ख आणि पराभूत म्हटले. या डिबेटमध्ये इस्रायल - हमास आणि रशिया - युक्रेन युद्ध यावर ट्रम्प यांनी बायडेन यांना घेरले. ट्रम्प यांनी बायडेन यांना अनेक वेळा कोंडीत धरले. जी बाब आज अमेरिकेतील तमाम डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना आणि अमेरिकन जनतेला खटकली असेल, ती म्हणजे, बायडेन यांनी जो संथपणा आणि विसरभोळेपणा या डिबेटमध्ये दाखवला, तो साहजिकच सर्वांच्या काळजीत भर घालणारा आहे.
बायडेन अन् ट्रम्प यांच्यात अशी झाली ‘तू-तू, मैं-मैं’
माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी वयाने लहान असल्यामुळे माझ्यावर टीका झाली. आता म्हातारपणामुळे लोक तक्रार करतात. ट्रम्प माझ्यापेक्षा फक्त ३ वर्षांनी लहान आहेत. तुम्ही माझे कर्तृत्व पाहावे. मी राष्ट्रपती झालो, तेव्हा परिस्थिती काय होती? ट्रम्प माझ्यासाठी काय सोडून गेले होते? नोकऱ्या नव्हत्या, बेरोजगारी १५ टक्क्यांनी वाढली होती. हे भयावह होते. त्यामुळे आम्हाला गोष्टी पुन्हा रुळावर आणायच्या होत्या. आम्ही १५ हजार नवीन रोजगार निर्माण केले. मी काही चुकीचे बोललो नाही. ट्रम्प यांच्यावर तीन खटले चालू आहेत. पत्नी गर्भवती होती, तेव्हा ट्रम्प पोर्न स्टारबरोबर संबंधात होते. - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
मी वयाशी संबंधित दोन चाचण्या केल्या आहेत. बायडेन यांची एकही चाचणी झाली नाही. मी दरवर्षी शारीरिक परीक्षा देतो. मी दोन गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. ते करण्यासाठी बॉलला दूरवर मारण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. पण बायडेन यांना ५० यार्ड्सवरही चेंडू मारता येत नाही. कर कमी केल्याने जगातील अनेक अर्थव्यवस्था सुधारल्या आहेत. मी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर सवलत दिली होती. अमेरिकेचे कर्जही कमी होत होते. मी अमेरिकेला एक यशस्वी देश बनवणार. बायडेन यांच्या मुलाने गंभीर गुन्हे केले आहेत. - डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
अध्यक्षीय निवडणुकीत मोठी उलथापालथ?ही पहिलीच डिबेट असताना या डिबेटमध्ये बायडेन यांना प्रचंड उत्साह दाखवणे गरजेचे होते. याउलट ट्रम्प यांनी डिबेटमध्ये जो उत्साह दाखवला स्वतःचा माइक म्यूट असतानासुद्धा बायडेनच्या भाषणात अडथळे आणले आणि स्वतःकडे आलेले प्रश्न ज्या शिताफीने परतावून लावले, त्याने आजच्या डिबेटमध्ये ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा नक्कीच वरचढ ठरले. अध्यक्षीय निवडणुकीत उलथापालथ व्हायची शक्यता नाकारता येत नाही. यानंतरची पुढची डिबेट १२ सप्टेंबरला होऊ घातली आहे आणि त्यानंतर कदाचित उपाध्यक्ष उमेदवारांची एक डिबेट होईल.
(लेखक अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेचे अभ्यासक आहेत.)