युक्रेनचा किल्ला ढासळला! युक्रेनच्या बाखमूत शहरावर रशियाचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:52 AM2023-05-22T05:52:33+5:302023-05-22T05:53:23+5:30
झेलेन्स्की म्हणाले, शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढणार?
किव्ह/मॉस्को : दीड वर्षापासून सुरू असलेल्या युद्धात रशियाला मोठे यश मिळाले आहे. युक्रेनचा किल्ला म्हणून झेलेन्स्की सतत उल्लेख करणाऱ्या बाखमूत शहरावर रशियाच्या खासगी सैन्याने ताबा मिळवला आहे. या शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल आठ महिन्यांची रक्तरंजित लढाई लढण्यात आली. झेलेन्स्की यांनी बाखमुतवर युक्रेनचाच ताबा असून, हे शहर आता फक्त आपल्या हृदयात आहे. शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या विजयासाठी लष्कराचे अभिनंदन केले आहे. बाखमूतवर ताबा मिळवल्याने रशिया युक्रेनमधील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात बाखमूतला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. बाखमूतचे सोव्हिएत काळातील नाव वापरून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आत्र्योमोव्स्कसाठी वॅगनर या खासगी लष्करी कंपनीने, तोफखाना आणि विमानांच्या साहाय्याने, आत्र्योमोव्स्क शहर ताब्यात घेण्यासाठीचे ऑपरेशन पूर्ण केले आहे.
पुढे काय होईल?
बाखमूत येथील पराभव हा युक्रेनसाठी एक मोठा धक्का, तर रशियाला यामुळे एक धोरणात्मक फायदा होईल. मात्र, यामुळे रशिया जिंकला असे समजणे अतिघाईचे ठरेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. बाखमूत हे दोनेत्स्कपासून ५५ किमी उत्तरेस आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे ८० हजार आहे. बाखमूत हे मीठ आणि जिप्सम खाणींनी वेढलेले एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे.
युक्रेनच्या ७ शहरांवर रशियाचा कब्जा
रशियाने काळ्या समुद्रातील बहुतेक व्यापारमार्ग ताब्यात घेतला आहे. याशिवाय रशियाने युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनच्या १८ % भूभागावर कब्जा केला आहे. या भूमीवर युक्रेनची ६ मोठी शहरे - सेवेरोडोनेत्स्क, डोनेत्स्क, लुहान्स्क, जपोरिझिया, मारियुपोल आणि मेलिटोपोल वसली आहेत. ही शहरे युक्रेनची अर्थव्यवस्था नियंत्रित करतात. त्याच वेळी बाखमूत हे ७ वे शहर आहे जिथे रशियाने कब्जा केला आहे.
युक्रेन म्हणते...
व्हिडीओ समोर आल्यानंतर युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री हन्ना मलियार यांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर असली तरी लढाई अजूनही सुरू आहे. सध्या या प्रदेशातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधा आमच्या सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली आहेत.
युद्ध भडकणार का?
बाखमूत आणि परिसरात आठ महिन्यांहून अधिक काळ लढाई सुरू आहे. जरी रशियन सैन्याने बाखमूत ताब्यात घेतले असले तरीही त्यांच्याकडे युक्रेनच्या नियंत्रणाखालील दोनेत्स्क क्षेत्रातील उर्वरित भाग ताब्यात घेण्याचे कठीण काम आहे. यामुळे युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती आहे.
कुणाचे नुकसान अधिक?
बाखमूतच्या लढाईत युक्रेन की रशियाला सर्वाधिक फटका बसला हे अद्याप समोर आलेले नाही. रशिया आणि युक्रेनचे हजारो सैन्य आणि सामान्य लोकांना यात आपले प्राण गमवावे लागल्याचे मानले जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मार्चमध्ये बाखमूतचे महत्त्व अधोरेखित केले होते. जर बाखमूत रशियाने ताब्यात घेतले, तर रशियाला सौदेबाजीसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळेल.