मॉस्को : रशियामध्ये गुरुवारी हॅकर्सनी एक विचित्र घटना घडवली. रशियातील कॅब सेवा देणारी सर्वांत मोठी ‘यांडेक्स टॅक्सी’ या कंपनीचे सॉफ्टवेअर हॅकर्सनी हॅक केले. ॲप हॅक केल्यानंतर हॅकर्सनी एका कमांडद्वारे सर्व टॅक्सी एकाच ठिकाणी पाठविल्या. प्रचंड वाहतूककोंडी झाल्यानंतर वाहनचालकांना हा प्रकार समजला. ४० मिनिटे हा प्रकार सुरू होता. सतत टॅक्सी येत राहिल्या. परिणामी तीन तास वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यानंतरच ठप्प झालेला रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला. मॉस्कोमधील यांडेक्स टॅक्सीसाठी काम करणाऱ्या डझनभर चालकांना सुरुवातीला काय होत आहे याची कल्पना नव्हती. वाहतूक पूर्ण ठप्प झाल्यानंतर चालकांनी एकमेकांशी संवाद साधला असता सर्वांचे पिकअप पॉईंट एकच दाखवत असल्याचे समजले. सायबर तज्ज्ञांच्या मते, हॅकर्सने यांडेक्सची सुरक्षा प्रणाली हॅक करून फेक राइडची ऑर्डर केली. या सर्व राइड्सचे पिकअप लोकेशनही एकाच ठिकाणी होते, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
सायबर न्यूजच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी मॉस्कोमधील प्रमुख मार्ग असलेले कुतुझोव्स्की प्रॉस्पेक्ट हेच सर्व कॅबचे पिकअप लोकेशन दिले होते. याच मार्गावर ‘हॉटेल युक्रेन’देखील आहे. या घटनेचा युक्रेन-रशिया युद्धाशीही संबंध असू शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, यांडेक्स टॅक्सी हॅकसाठी कोण जबाबदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटरवर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.