चीनमधील शांघाई येथे एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला १३ हजार युआनचा (सुमारे १.५६ लाख रुपये) गंडा घातला गेला. ही तरुणी बोगस ज्योतिषाच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता या बनावट ज्योतिषांना पकडले आहे. आरोपी हे सिंगल लोकांना लक्ष्य करायचे, अशी बाब तपासातून उघड झाली आहे. ते प्रेमाशी संबंधित मंत्र आणि साधनेच्या पद्धती सांगायचे. त्यांनी फसवणूक करून ८००,००० युआन (९६ लाख रुपये) एवढी रक्कम जमवली होती.
या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तरुणीचं नाव माई असं आहे. ती टिकटॉकवर पोस्ट केलेल्या राशिभविष्याच्या एका व्हिडीओच्या माध्यमातून या ज्योतिषांच्या जाळ्यात सापडली होती. माई हिने सुवुवातीला आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी ५९९ युआन (सुमारे ७ हजार रुपये) दिले. ज्योतिषांनी तिला तिचा बॉयफ्रेंड परत मिळू शकतो म्हणून सांगितलं, त्यामुळे ती खूप खूश झाली.
मात्र या बनावट ज्योतिषांनी बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी तिला काही विधी करावे लागतील आणि त्यासाठी तिला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तिला दोन व्हिडीओ पाठवण्यात आले. त्यामध्ये दोन मेणबत्त्या जळत होत्या. पहिल्या मेणबत्तीचा अर्थ हा नवी नाती जोडण्याचं बॉयफ्रेंडचं लक संपुष्टात येईल आणि दुसरी मेणबत्ती पेटण्याचा अर्थ तिला तिच गुडलक मिळेल, असं सांगण्यात आलं.
त्यानंतर सुमारे आठवडाभर चालणाऱ्या कथित काळ्या जादूचा खेळ सुरू झाला. तरुणीला आरोपींनी सांगितले की, ते सैतानांकडून शक्ती घेऊन येतील. त्यामुळे तिचं नातं पूर्वीसारखं होईल. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्याशिवाय कुणाचाही विचार करणार नाही. त्यासाठी तरुणीला एक यादी देण्यात आली. यामध्ये हजारो रुपयांच्या ताईतांचे रेट लिहिलेले होते. हे आरोपी प्रेमामध्ये आपलं लक आजमावून पाहणाऱ्या लोकांना लक्ष्य करत होते. जेव्हा या तरुणीची कहाण सोशल मीडियावर आली तेव्हापासून लोकांनी तिलाही खडेबोल सुनावण्याला मागेपुढे पाहिले नाही.