नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:40 PM2024-09-13T15:40:33+5:302024-09-13T15:43:53+5:30
रशियन सैन्यात भरती झालेल्या ४५ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.
Russian Army Released Indian Youths:रशिया युक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसला असून त्याचा काही प्रमाणात फटका भारतीयांनाही बसला आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या किमान ४५ भारतीयांनारशिया-युक्रेन सीमेवर असलेल्या त्यांच्या छावणीतून सोडण्यात आले आहे. फसवणूक करून रशिया युक्रेन युद्धात काम करायला भाग पाडले गेलेले हे ४५ भारतीय तरुण शुक्रवारी पहाटे देशात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मॉस्को दौऱ्यानंतर रशियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अद्यापही ५० भारतीय हे रशियाच्या ताब्यात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीनंतर रशियन सैन्यात अडकलेल्या ४५ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४५ भारतीयांना रशियन सैन्यातून मुक्त करण्यात आले असून सुमारे ५० जणांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ४५ पैकी ३५ भारतीयांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये मॉस्कोला गेले होते, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भारतीयांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.
रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांचा मुद्दा भारत-रशिया संबंधांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बनला होते. जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी रशियन सैन्यात सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुटका करण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला. यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी ४५ भारतीय देशात परतले आहेत.
भारतीय तरुणांना चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून काही मध्यस्थांनी रशियाला नेले होते. त्यानंतर त्यांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले, जिथे ते युक्रेनशी युद्ध लढत होते. अनेक भारतीय तरुणांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला. त्यानंतर या भारतीयांना सोडवण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या. यापैकी सहा भारतीय दोन दिवसांपूर्वी परतले आहेत आणि बरेच जण लवकरच मायदेशी परततील. अजूनही ५० हून अधिक भारतीय नागरिक रशियन सैन्यात सेवा देत आहेत, ज्यांना आम्ही शक्य तितके परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, स्थानिक मध्यस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांना रशियात येण्याचे आमिष दाखवले होते. नवी दिल्ली ते तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या मानवी तस्करी नेटवर्कने या पीडितांना रशियात चांगल्या नोकऱ्या देऊ केल्या होत्या. रशियात पोहोचताच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांना युद्ध प्रशिक्षण घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आले. या तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांच्या मुलांनी रशियन सरकारी कार्यालयात मदतनीस म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र मध्यस्थावर विश्वास ठेवल्याने त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना सीमेवर युद्ध लढण्यास भाग पाडले गेले.