टोकियो : हिंद-प्रशांत महासागराचा प्रदेश मुक्त, सर्वांना सामावून घेणारा, प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता यांचा आदर करणारा असावा याकरिता भारत व जपान एकजुटीने प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या प्रदेशातील सुरक्षा अबाधित राखण्यावर दोन्ही देशांचा कटाक्ष असेल, असेही मोदी यांनी सांगितले.
क्वाड परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून जपानच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी जपानच्या एका अग्रगण्य दैनिकात एक लेख लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत भारताने उत्पादन, सेवा क्षेत्र, कृषी तसेच डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पाया मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानचे चांगले सहकार्य मिळत आहे. (वृत्तसंस्था)
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मोदींचे स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो विमानतळावरून तेथील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत मोदी यांचे जोरदार स्वागत केले. या लोकांच्या हातात काही फलक होते. ‘जो काशी को चमकाए है, वो टोकियो आए है, जो राम को लाए है, वो टोकियो आए है’ अशा घोषणा या फलकांवर लिहिलेल्या होत्या.
जपानी बालकाने केले हिंदीतून संभाषणरित्सुकी कोबायाशी हा जपानी बालक अस्खलित हिंदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणाला, “जपानमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमची मला स्वाक्षरी मिळू शकेल का?” त्यामुळे आनंदी झालेल्या मोदींनी त्याला विचारले की, “खूप छान हिंदी बोलतोस. ही भाषा कुठे शिकलास?” त्यावर रित्सुकीने उत्तर दिले, “मला हिंदी उत्तम बोलता येत नाही. पण, त्या भाषेत कोणी बोलले तर मला ते कळते. आता तुमची स्वाक्षरी मिळाली. मी खूश आहे.”
टोकियो : भारतात तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त, संशोधन या क्षेत्रामध्ये जपानच्या सॉफ्टबँक कॉर्पोरेशनने मोठी गुंतवणूक करण्यासंदर्भात त्या कंपनीचे संस्थापक व सीईओ मासायोशी सॉन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चर्चा केली. या कंपनीने पेटीएम, पॉलिसी बाझारमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. इलेक्ट्रिकल मोटारींचे उत्पादन व त्याबाबतचे संशोधन तसेच भारतात पुनर्प्रक्रिया केंद्रे उभारण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे सोमवारी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे सल्लागार ओसामू सुझुकी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुझुकी कंपनीने भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी ओसामी सुझुकी यांना केले.